Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 434 नवे कोरोना बाधित; 4 जणांचा मृत्यू
दिवसागणित पोलिस दलातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांत 434 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र पोलिसांनाही (Maharashtra Police) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) घट्ट विळखा बसला आहे. दिवसागणित पोलिस दलातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांत 434 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस दलातील कोरोना बाधितांचा आकडा 20,801 वर पोहचला आहे. त्यापैकी 3,883 सक्रीय रुग्ण (Active Cases) असून 16,706 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 212 पोलिसांना कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
कोरोना व्हायरस संकट काळात पोलिस दलावरील ताण अधिक वाढला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी जीवावर उदार होत कर्तव्य बजावले. नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या पोलिस दलाने कोविड-19 संकटातही गरजूंची मदत केली. कोरोना संकटकाळात पोलिसांच्या कार्यावर डॉक्युमेंटरी देखील तयार करण्यात आली आहे. ही डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ANI Tweet:
दरम्यान, लवकरच राज्यात पोलिसांची मेगा भरती होणार आहे. तब्बल 12,528 पदांसाठी भरती होणार असून त्याची प्रक्रीया लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी 13% जागा राखून ठेवून भरती प्रक्रीया होणार असल्याचेही गृहमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या राज्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा मोठा आहे. तसंच मुंबईत देखील काल मध्य रात्रीपासून कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यातून अत्यावश्यक सेवा, कामासाठी बाहेर पडत असलेल्या लोकांना मुभा देण्यात आली आहे. मात्र अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तसंच कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होणारे अत्याचार त्यामुळे एकूणच पोलिस यंत्रणेवरील ताण अधिक वाढणार आहे.