लॉकडाऊन नंतरही होत असणारी गर्दी धक्कादायक; घरीच सुरक्षित राहण्याची सुप्रिया सुळे यांची कळकळीची विनंती
तसंच नागरिकांना सुरक्षित राहण्याची कळकळीची विनंतही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर काल (22 मार्च) राज्यात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. तसंच जमावबंदी देखील लागू करण्यात आली. मात्र तरी देखील रस्त्यांवरील गर्दी काही केल्या कमी होईना. काल जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने लॉकडाऊनचा आदेशही गांर्भीयाने घेतला जाईल अशी आशा होती. मात्र रस्त्यावरील गर्दी पाहता लॉकडाऊनचा आदेश लोक पाळत नसल्याचे दिसून आले. विविध शहरातील रस्त्यांवरील वाहतूक आवाक करणारी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे. तसंच नागरिकांना सुरक्षित राहण्याची कळकळीची विनंतही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
"विविध शहरांतील रस्त्यांवरील गर्दी धक्कादायक असून पोलीस, डॉक्टर्स, रुग्णालये आणि सरकारी अधिकारी आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत. त्यामुळे सरकारनी दिलेल्या आदेशांचे पालन करा. विनाकारण वाहतूक व्यवस्थेवर ताण आणू नका. घरीच रहा, सुरक्षित रहा आणि आपला जीव वाचवा," अशी कळकळीची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (सध्या घरात राहणं अत्यंत महत्त्वाचं असं आवाहन करत राज ठाकरे यांनी डॉक्टर्स, पोलिस कर्मचाऱ्यांचे मानले आभार)
सुप्रिया सुळे यांचे ट्विट:
लॉकडाऊनचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी घेण्यात आला आहे. मात्र आज रस्त्यांवरील केलेली गर्दी पाहता लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी नागरिकांनी घरी राहावे, असे आवाहन केले आहे.