Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची लागण

कालपर्यंत 31 वर असलेली कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आपले जाळे पसरवायला सुरुवात केली आहे. कालपर्यंत 31 वर असलेली कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, ठाणे, नवी मुंबई नंतर आता औरंगाबाद (Aurangabad) येथे एका 59 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ही महिला रशिया (Russia) आणि कझाकस्तान (Kazakhstan) येथून परतली होती. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सिने-नाट्यगृह, मॉल्स, जिम आणि स्विमिंग पूल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुण्यातील एका दांम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली आणि त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देली आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी मुंबईतील रेल्वेचीही खास सफाई करण्यात येत आहे. (नवी मुंबई येथील Mindspace Airoli मध्ये Majesco कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण; सफाईसाठी ऑफिसेस बंद)

PTI Tweet:

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या:

पुणे- 15

मुंबई- 5

ठाणे- 1

कल्याण- 1

नवी मुंबई- 2

नागपूर- 4

यवतमाळ- 2

अहमदनगर- 1

औरंगाबाद- 1

देशात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित 100 रुग्ण आढळून आले असून सरकारकडून खबरदारी घेण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता सार्क देशांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोनाला मात करण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.