Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 394 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 6817 वर
पुणे मंडळात एकूण 1020 रुग्ण झाले आहेत
मुंबईत (Mumbai) आज कोरोना व्हायरसचे (Coronavirus) नवे 357 रुग्ण आढळून आले, त्यामुळे शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4589 वर पोहचला. पुणे मंडळात एकूण 1020 रुग्ण झाले आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रात (Maharashtra) आज 394 नवीन कोरोन व्हायरसचे रुग्ण व 18 मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 6817 व मृतांचा एकूण आकडा 310 झाला आहे. आजपर्यंत एकूण 957 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली. सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीबाबत महाराष्ट्र देशात अव्वल आहे.
एएनआय ट्विट -
मुंबईतील नवीन 357 कोरोना व्हायरस रुग्णांसह 11 मृत्यूची नोंद झाली असून, एकूण रुग्णांची संख्या 4589 आणि एकूण मृत्यूंची संख्या 179 झाली आहे. सध्या शहरात 3815 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या धारावी येथे आज कोरोना विषाणूचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत. धारावीतील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या आता 220 झाली आहे आहे. यामध्ये 14 मृत्यूंचा समावेश आहे. (हेही वाचा: भारतात गेल्या 24 तासांत 1752 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; देशात एकूण संक्रमितांची संख्या 23,452 वर)
महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबई, ठाणे मंडळ मिळून 5279 रुग्ण, नाशिक मंडळात 197 रुग्ण, पुणे मंडळात 1020 रुग्ण, कोल्हापूर व औरंगाबाद मंडळात अनुक्रमे 45 व 52 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या संकटामुळे लॉक डाऊन सुरु आहे, अनेक लोकांना घरी बसावे लागत आहे. तसेच असे अनेक लोक आहेत जे सध्याच्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर कोरोनाची सोप्या भाषेत माहिती, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करु नये याबाबत या मजूरांना माहिती देण्यात येत आहे. राज्यातील समुपदेशक, मनोविकार तज्ञ आणि मनोविकार परिचारिका यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, आज संध्याकाळी 6 पर्यंत देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 1752 रुग्णांची आणि 37 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशा प्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 23,452 झाली आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट हा 20.57 टक्के इतका आहे.