Coronavirus In Dharavi: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 15 रुग्ण आढळल्याने आकडा 2975 वर पोहचला

त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांचा धारावीतील आकडा 2975 वर पोहचल्याची माहिती नागरि अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

Coronavirus In Dharavi Updates: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून दिवसागणिक रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान, आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) कोरोनाचे आणखी 15 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांचा धारावीतील  आकडा 2975 वर पोहचल्याची माहिती नागरि अधिकाऱ्यांनी दिली आहे. धारावीत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच धारावी पॅटर्नचा सुद्धा अनेक ठिकाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून विविध जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच सध्या सरकारने कोरोनाची चाचणीचे दर सर्वसामान्यांना परवडावेत यासाठी त्याच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड सेंटरसह क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरीही मृत्यूदर कमी झाल्याचे त्यांनी म्हटले होते.(Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 364 जणांना कोरोनाची लागण तर 4 जणांचा गेल्या 24 तासात बळी)

कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. तसेच जगभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. तसेच कोविड19 वरील अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. पण सीरम इंन्सिट्युट ऑफ इंडिया यांनी 2024 च्या अखेर पर्यंत लस उपलब्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, काल दिवसभरात एकुण 23,365 नवे रुग्ण आढळले असुन राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 11,21,221 वर  पोहचली आहे. कालपासुन राज्यात कोरोनामुळे 474 जणांंचा मृत्यु झाला असुन एकुण कोरोना मृतांंची संख्या 30,883 इतकी झाली आहे. या सगळ्या वाढलेल्या आकडेवारीत एक दिलासादायक माहिती अशी की राज्यात आज दिवसभरात 17,559 रुग्णांंना डिस्चार्ज देण्यात आला आहे यानुसार आजवर कोरोनामुक्त  झालेल्या रुग्णांंचा आकडा हा 7,92,832 इतका झाला आहे. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे 2,97,125 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.