Coronavirus: मुंबईच्या धारावी परिसरात आज आणखी 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, एकूण संक्रमितांचा आकडा 808 वर पोहचला

Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) देशात कहर सुरू आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 56 हजाराच्या वर पोहचला आहे. मुंबईच्या (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावी येथे आज कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळले. यातून धारावीमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या 808 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या (BMC) अधिका्यांनी ही माहिती दिली. धारावी, बीएमसी आणि महाराष्ट्र सरकारला कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कडक आव्हान उभे करत आहेत, मुख्यत: लोकसंख्येच्या घनतेमुळे, ज्यामुळे सामाजिक अंतर खूप कठीण होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3390 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशभरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 56,342 झाली आहे.  महाराष्ट्रात 18 हजारहुन अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे, 694 लोकांनी जीव गमावला आहे तर 3301 लोकं बरे झाले आहेत. (Coronavirus in India: भारतात संक्रमितांची संख्या 56342,गेल्या 24 तासांत 3390 नवीन रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 29.36 टक्के)

दुसरीकडे, गुरुवारी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात 77 कैदी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. जेलचे 26 कर्मचारीदेखील संक्रमित आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्पाचा कालावधी संपण्यासाठी केवळ 10 दिवस शिल्लक असताना कोरोना हॉटस्पॉट मधील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जावू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. त्यापैकी मुंबई, ठाणे, पुणे शहारात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे, गुरुवारी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, "सध्याच्या लॉकडाउनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. परंतु, मे महिन्याच्या अखेरपर्यंत जागरुक राहावे लागणार आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्राला मे महिन्याच्या अखेर पर्यंत ग्रीन झोन बनवण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे."