Coronavirus: कोरोनामुळे तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; नवी मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, आता वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या कचाट्यात येत असल्याचे समजत आहेत. यातच कोरोनाच्या जाळ्यात अडकून तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) उपचार दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे वसाहतीमध्ये राहणारे 53 वर्षीय पोलीस कर्मचारी दररोज मुंबई ते कामोठे असा एसटी प्रवास करुन कर्तव्य बजावत होते. त्यांना प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे पोलीस दलाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे. मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले 57 वर्षीय हवालदार नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू पावले होते. त्यानंतर शनिवारी करोनामुळे मुंबई पोलीस दलातील 52 वर्षीय हेड कान्स्टेबलचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आज नवी मुंबईत मरण पावलेले तिसरे पोलीस कर्मचारी यांना यापूर्वी कर्करोगाचे उपचार सुरु होते. तरीही ते मागील अनेक दिवसांपासून आपले कर्तव्य बजावत होते. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या घटनेबरोबरच रविवारी पालिका क्षेत्रात तीन नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे नवी मुंबई येथील करोनाबाधितांचा आकडा 52 वर पोहचला आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार
राज्यात 23 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी यामध्ये 11 पोलीस अधिकारी आणि 53 पोलीस शिपायांचा समावेश होता. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, 22 एप्रिलला एकाच दिवसात तब्बल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यातील 96 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.