Coronavirus: कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना COVID-19 ची लागण झाल्याची बातमी खोटी, BMC ने दिले स्पष्टीकरण
कांदिवली (Kandivali) येथील शताब्दी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेकडून (BMC) देण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने(Coronavirus) थैमान घातले असून त्याच्या बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनच्या काळात घरीच थांबण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यासोबत तुलना केली असता महाराष्ट्रातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याच पार्श्वभुमीवर कांदिवली (Kandivali) येथील शताब्दी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेकडून (BMC) देण्यात आले आहे.
देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तसेच पोलीस सुद्धा रस्त्यावर गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत आहे. तर शताब्दी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. दरम्यान, सध्या लॉकडाउनच्या काळत नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा दिल्या जात आहेत. तरीही नागरिकांची गर्दी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.(CM Uddhav Thackeray Facebook Live: 'कोरोना' च्या संकटकाळात समाज घातक व्हायरस पसरवणारे कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत- उद्धव ठाकरे)
दरम्यान,महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशावेळी नागरिकांना वारंवार घरी राहून लॉक डाऊनचे पालन करण्यास सांगितले जात आहे. जर का 15 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो असे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.