Coronavirus: कोरोनामुळे निधन झालेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या परिवाराला सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत- अनिल देशमुख
तसेच परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीचे आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणाने पाळावेत असे वारंवार आवाहन केले जात आहेत. वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवस रात्र उपचार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करत आहेत. याच दरम्यान मुंबईतील पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची दुख बातमी समोर आली आहे. त्यामुळे आज मुंबई पोलिसांच्या वतीने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कोरोनामुळे निधन पावलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला सरकारकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करणार आहेत. तसेच परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीचे आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे.
कोरोनाच्या विरोधातील लढाई लढताना मुंबई पोलीसांच्या दलातील दोन वीरांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून याबाबत दुख व्यक्त केले जात आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा या प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तर आता या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सरकार धावून आले असून त्यांना हवी ती मदत केली जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)
दरम्यान. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सद्यची परिस्थिती लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. तसेच ज्या नागरिकांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे त्यांनी सुद्धा त्यासंदर्भातील नियमांचे पालन करावे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर येत्या 3 मे पर्यंत राज्यात लॉकडाउनचे नियम कायम राहणार आहे. मात्र पुढील लॉकडानसंदर्भातील निर्णय राज्य सरकार काय घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.