Coronavirus: मुंबईत 2 महिन्यांची चिमुकली, 3 वर्षांची बहीण आणि आई कोरोना व्हायरसमुक्त; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

या तिघींचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावरील सुरु असलेल्या उपचारांना यश आल्याने या तिघींना सैफी रुग्णालयातून मंगळवारी सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र आणि देशात कोरोन व्हायरस विरुद्धची लढाई रणनिती ठरवून सुरु आहे. येनकेन प्रकारेन कोरोना व्हायरस संक्रमन (Coronavirus) नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवायचेच असे सध्या या लढाईचे लक्ष्य आहे. काही प्रमाणात त्याला यश येते आहे तर काही प्रमाणात गणित चुकत आहे. दरम्यान, या लढाईबाबतची एक सकारात्मक बातमी आहे. मुंबई (Mumbai) येथली सैफी रुग्णायल (Saifee Hospital) येथे उपचार घेत असलेल्या कोरोना संक्रमित 2 महिन्यांची चिमुकली, 3 वर्षांची बहिण आणि आई अशा तिघांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे सैफी रुग्णालातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील कोरोना रुग्णालयात एक महिला आणि तिच्या दोन मुलींवर उपचार सुरु होते. या तिघींचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावरील सुरु असलेल्या उपचारांना यश आल्याने या तिघींना सैफी रुग्णालयातून मंगळवारी सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली. तब्बल 2 आठवडे कोरोना विरुद्ध डॉक्टरांच्या सहाय्याने संघर्ष केल्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आले. या तिघी मायलेकी आता आपल्या घरी परतल्या आहेत. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या पतीने मुंबई मिररसोबत बोलताना सांगितले की, त्यांच्या काकांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संपर्क केला. कोरोनाची चाचणी करुन घेण्यास सांगितली. मात्र, कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी येणारा खर्च आम्हास परवडणारा नाही. दरम्यान, या कुटुंबाने एका माजी मंत्र्याशी संपर्क साधला. त्या मंत्र्याने चाचणीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवत मेट्रोपोलीस लॅबमध्ये फोन केला. त्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत पतीचे वडील, पत्नी आणि दोन मुली पॉझिटीव्ह आढळल्या. त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी 9 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Lockdown चा 'असा'ही उपयोग! वाशीम जिल्ह्यातील पती-पत्नीने 21 दिवसात खोदली 25 फुटांची विहीर (See Photos))

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे हे खरे आहे. मात्र, उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगली आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील मृत्यूदर चिंता वाढवणारा आहे.