पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी पुण्यातील महाविद्यालयं 11 जानेवारीपासून होणार सुरु

यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालयं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Savitribai Phule University Pune (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये, शाळा मागील मार्च 2020 पासून बंद आहेत. त्यामुळे सर्व शिक्षण हे ऑनलाईन माध्यमातून घेतले जात आहे. मात्र महाराष्ट्र आता अनलॉकच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule University, Pune) अंतर्गत येणारी महाविद्यालयं येत्या 11 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालयं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून या विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यात येणा-या महाविद्यालयांचा समावेश आहे.हेदेखील वाचा- Schools Reopen in Nashik: नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू; ड्यूटी जॉईन करण्यापूर्वी 62 शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ही महाविद्यालये सुरु करताना योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि कर्मचा-यांचे तपासणी यांसारखी सर्व काळजी घेतली जाणार आहे. ही महाविद्यालयं सुरु करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

इंजिनिअरिंग, वास्तुकला, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, शारीरिक शिक्षण आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांची द्वितीय वर्ष आणि त्या पुढील वर्षाचे वर्ग सुरू होणार आहे. तसेच कला, विज्ञान, वाणिज्य, समाजशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, पत्रकारिता आणि संज्ञापन अशा अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्ष व त्यापुढील वर्ग सुरू होणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 9 ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शाळा सोमवारी पुन्हा उघडल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी 62 शिक्षकांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. ग्रामीण भागातील आणि नाशिक शहर हद्दीतील 1,324 शाळांपैकी 846 शाळांनी 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.