पुण्यात पुन्हा थंडीची लाट; 6 फेब्रुवारी पर्यंत रात्रीच्या तापमानात घट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस शहरातील तापमान रात्रीच्या वेळेस अजून काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामधील काही दिवस मध्यम स्वरुपाची थंडी अनुभवल्यानंतर आता पुन्हा एकदा पुणेकरांना कडक थंडीचा अनुभव घेता येणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पुणे (Pune) शहरातील तापमान रात्रीच्या वेळेस अजून काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी, पुण्यातील तापमान दिवसा 30.1 अंश सेल्सियस तर रात्रीचे तापमान 10.7 अंश सेल्सियस इतके होते. मात्र त्यात पुढील काही दिवसांत अजून घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Updates: उत्तर महाराष्ट्रात,विदर्भात किमान तापमानामध्ये घट; मुंबईकरांची सकाळही गारव्यात)
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरातील तापमानात बदल घडून आला आहे. पुणे शहरातील रात्रीचे तापमान 8 अंश सेल्सियस वरुन कमी होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे विभागाच्या अध्यक्ष अनुपम कश्यपी यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना दिली आहे. दरम्यान, तापमानात झालेली घट 6 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार आहे. या काळामध्ये शहरातील दिवसाचे तापमान 30 अंश सेल्सियस पर्यंत असेल. कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी नंतर शहरातील दिवस आणि रात्रीचे तापमान हळूहळू वाढत जाईल.
फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रता जानेवारी महिन्यातील थंड वाऱ्यांच्या तीव्रतेपेक्षा कमी असेल. या वातावरणातील बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमानात घट दिसून येईल. हवामानातील बदलाची माहिती देताना कश्यपी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उत्तर भागाकडून थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे तापमानात घट 6 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील तापमानाचा पाराही खाली उतरला असून नागरिकांना सकाळ आणि रात्रीच्या वेळेस थंडीचा अनुभव घेता येत आहे.