राजकीय संकटामध्येही CM Uddhav Thackeray जनतेमागे खंबीरपणे उभे; प्रशासनासोबतच्या बैठकीमध्ये कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता, आपत्ती व्यवस्थापन, आषाढी वारीबाबत चर्चा
आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली.
राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका, ती तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही त्यांनी निर्देश दिले.
मास्क सक्तीची वेळ येऊ नये
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क घालणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लोकल रेल्वे प्रवासात मास्क सक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
राज्यातील कोरोना स्थितीबद्दल आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आहे. राज्यात साधारणतः 25 हजार रूग्ण आहेत, त्यापैकी 95 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पाच टक्के रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनवर एक टक्के तर आयसीयूमध्ये अर्धा टक्के रुग्ण आहेत. व्हेंटीलेटरवर आजमितीस 25 रुग्ण आहेत असे सांगून वर्धक मात्रा वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील नालेसफाई तसेच मलेरियाचा प्रादुर्भाव याविषयी माहिती घेऊन सूचनाही केल्या.
आपत्तीत यंत्रणांनी सतर्क राहावे
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी विशेषतः कोकण विभागातील तयारी आणि सज्जता याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांनी माहिती दिली. दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळीच देण्यात याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी, महाड, खेड आणि चिपळूण परिसरांबाबत आतापासूनच विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची तसेच अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी उपाययोजना, सॅटेलाईट- रेडीओ संपर्क यंत्रणा, तसेच मोबाईल चार्जिंगकरिताही व्यवस्था, पाटबंधारे विभागाची पाणी सोडण्याबाबत तसेच आपत्कालीन परिस्थितीत सायरनद्वारे सूचना देण्याची यंत्रणा, वापरण्यात येणाऱ्या बोटींची चाचणी याविषयी माहिती देण्यात आली.
वारकऱ्यांची काळजी घ्या
आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारीत वारकरी मंडळी देहभान हरपून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करण्यात यावी. विशेषतः मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा याबाबतीत जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा: शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे भावनिक; एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण)
पेरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच सुमारास 23 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांची उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी 25 जून ते 1 जुलै हा कृषी संजीवनी सप्ताहही आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावांगावामध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेऊन ती अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)