पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले
त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल" असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाला (Pooja Chavan Suicide Case) अनेक राजकीय वळणे लागली आहेत. त्यात वनमंत्री संजय राठोड यांचा या आत्महत्येशी संबंध असल्याची टिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केल्यानंतर आता हे प्रकरण आणखीनच चिघळत चाललं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. "या प्रकरणी व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल" असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
"गेले काही दिवस काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आय़ुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.हेदेखील वाचा- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
दरम्यान या आत्महत्येशी संबंधित एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) समोर आली ज्यात एका कथित नेत्याचा समावेश असल्याचे उघड झाले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता भाजपकडून वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमागे काही राजकीय नेत्यांचा संबंध असल्याची दावा करत याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यातच पूजा हिचा शवविच्छेनाचा अहवाल समोर आला असून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.