Palghar Mob Lynching Case: पालघर मॉब लिंचींग प्रकरणामागे धार्मिक कारण नाही - उद्धव ठाकरे

2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अतुलचंद्र कुलकर्णी नावाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

Uddhav Thackeray | (Photo Credits-ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पालघर मॉब लिंचींग ( Palghar Mob Lynching) प्रकरणाबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून (Facebook Live) राज्यातील जनतेशी संवाद साधला. पालघर मॉब लिंचींग ही लांछनास्पद गोष्ट आहे. हे प्रकरण घडले. असे घडायला नको होते. या प्रकरणाला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. या प्रकरणामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. त्यामुळे बाकिच्यांनी त्यात तेल ओतण्याचे काम करु नये. राज्य सरकार दोषींवर योग्य ती कारवाई करत आहे. या प्रकरणात 5 प्रमुख आरोपींसह 110 जणांना अटक करण्यात आले आहे. 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. CID DG Crime अतुलचंद्र कुलकर्णी नावाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

मॉब लिंचिंग झालेल्या घटनेसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. सर्वजन ही घटना पालघर येथे घडल्याचे सांगत आहे. पण, अनेकांना नेमके माहिती नाही की पालघर पासून हे घटनास्थळ किती दूर आहे. ही घटना गडचिंचळे भागात घडली. हा भाग अत्यंत दुर्गम आहे. हे गाव एखाद्या पाड्याप्रमाणे आहे. दादरा व नगरहवेली या केंद्रशाशीत प्रदेशानजिक आहे. महत्त्वाचे म्हणजे हा भाग इतका अविकसीत आणि दुर्गम आहे की, इथे पोहोचायचे तर महाराष्ट्र पोलिसांनाही दादरा व नगरहवेली या केंद्रशासीत प्रदेशातून यावे लागते.

मॉब लिंचिंगचे बळी ठरलेले दोन साधू आणि त्यांचा चालक हे गुजरातमध्ये निघाले होते. त्यांना केंद्र शासित प्रदेशाच्या सीमेवर अडवण्यात आले. पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ते परत आले. लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी गुजरातला जाण्यासाठी आडमार्गाचा वापर केला. हा मार्ग गडचिंचळे या भागातून जातो. अदिवासी पाडा असलेल्या या भागात गेले काही दिवस या परिसरात चोर असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. या अफवेमुळेच या दोन साधुंचा बळी गेला असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाऊन हटविण्यात आला नाही, रुतलेल्या अर्थचक्राला बाहेर काढण्यासाठी नवी सुरुवात: उद्धव ठाकरे)

एएनआय ट्विट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मला फोन आला होता. त्यांनाही मी सत्यस्थिती सांगितली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सर्व गोष्टींची माहिती असतेच. त्यामुळे त्यांनीही सांगितले की, त्या पाड्याच्या आसपास धार्मिक हिंसाचार घडावी अशी स्थिती नाही. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय स्तरावर चौकशी केली जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह

दरम्यान, नागरिकांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये. या दोन साधू आणि त्यांच्या चालकावर संशय होता तर त्यांना रात्रभर थांबवून दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हवाली केले असते किंवा त्याच क्षणी पोलिसांशी संपर्क साधला असता तर, ही घटना घडली नसती. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही स्थितीत कायदा हातात घेऊ नये, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.