सीएम उद्धव ठाकरे यांचा वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरकांशी संवाद; जाणून घेतले कोरोना विषाणू रोखण्यासाठीचे पर्याय
ते पुढे म्हणाले, ‘आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातील भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे.’
राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरकांशी ई-संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये, कोरोनाला रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर पर्याय आहेत का याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे विचार जाणून घेतले व सूचना स्विकारल्या. कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक असून, या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातील भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे.’ ते पुढे म्हणाले, ‘आपल्याला कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजी घ्यावीच लागणार. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण करू नये.’
काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. आपण लॉकडाऊन टाळू शकतो त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया.’ त्याचबरोबर येत्या दोन दिवसात दृष्य परिणाम दिसले नाही तर सर्व तज्ज्ञ आणि संबंधितांशी चर्चा करून इतर पर्यायांची माहिती घेऊन नवीन कडक नियमावली जाहीर केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. (हेही वाचा: अमरावतीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट)
दरम्यान, कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. 1 ली ते इ. 8 वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता, सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. 9 वी आणि इ. 11 वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल.