मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा आढावा; रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अनुक्रमे 372.97 कोटी, 116.78 कोटी व 37.11 लाख निधी वितरीत

राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या वादळाने धुमाकूळ घातला होता. या ठिकाणी अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही इथले जीवन पूर्वपदावर येत आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

3  जून रोजी राज्यावर निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) धोका उद्भवला होता. राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या वादळाने धुमाकूळ घातला होता. या ठिकाणी अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही इथले जीवन पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत आढावा घेतला. या बैठकीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाई वाटप, मदत व पुनर्वसन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा गणेशोत्सवाचा आढावा घेतला.

तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे, अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच असल्याची माहिती दिली. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अनुक्रमे 372.97 कोटी, 116.78 कोटी व 37.11 लाख इतका निधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून वितरीत करण्यात आला आहे.

नुकसानग्रस्तांना उर्वरित मदत तत्काळ देण्यात यावी यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. कुठलाही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोकणात सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते, वीज पुरवठा, मोबाईल कनेक्टीव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी, या मधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 19 जुलैला सोलापूर दौऱ्यावर)

दरम्यान, 3 जून रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने वेध घटला होता. कोकणात धुमाकूळ घालून हे वादळ मुंबईच्या वाटेला न जाता उत्तरेकडे सरकले होते. त्यावेळी मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता.