CM Uddhav Thackeray Calls Kalpita Pimple: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद; आरोपींना कडक शिक्षेचे आश्वासन

त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलणं करून दिलं.

Kalpita Pimple (Photo Credits: ANI)

ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोनवरुन संवाद साधत हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Thane Mayor Naresh Mhaske) यांनी कल्पिता पिंपळे यांची आज रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलणं करून दिलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं.

"तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा," असा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळे यांना धीर दिला आहे. तसंच त्यांच्या धैर्याचं देखील त्यांनी कौतुक केलं. तुमच्या प्रकृतीचे रिपोर्ट मला वारंवार येत असतात, असंही ते म्हणाले.

AIR News Tweet:

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या धीरामुळे बळ मिळाल्याचे कल्पिता पिंपळे यांनी म्हटले आहे. तसंच पालिका आणि सर्वजण माझ्या पाठीशी आहेत, असंही त्या म्हणाल्या. तसंच पूर्ण बरे झाल्यावर कामावर रुजू होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत अशा प्रकारची घटना पुन्हा होता कामा नये, असे आदेशच आयुक्त विपीन शर्मा यांना दिले आहेत.

दरम्यान, यापूर्वी अनेक नेतेमंडळींनी कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पिंपळे यांची भेट घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो, असा शब्द दिला होता.