मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन, म्हणाले 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं'
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,"असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. यामध्ये राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत निर्णय होईल. दरम्यान सर्व पक्षांनी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला. मनसेच्या अधिकृत ट्विटर पेजवर मनसेकडूनच याबाबत माहिती देण्यात आली. "राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,"असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.
राज्यात कोरोनाचे निर्बंध अधिकाधिक कडक होण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी याआधीच फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितले आहे. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर लॉकडाऊन करावे लागतील असे संकेतही दिले. मात्र लॉकडाऊनला विरोधी पक्ष भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विरोध दर्शवलेला आहे. याशिवाय, सत्ताधारी पक्षात देखील याबाबत एकमत नसल्याचे दिसून येत आहे.हेदेखील वाचा- Lockdown or Strict Restrictions in Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊन की कडक निर्बंध? राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज फैसला
एकीकडे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने, काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असं म्हटलं आहे.
या फोननंतर 'आपण सर्वांनी सरकारी सूचनांचे पालन करावे आणि सरकारी यंत्रणेला सहकार्य करावे' असे आवाहन मनसेच्या अधिकृत ट्विटर पेजवरुन करण्यात आले आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. "आम्ही राज्यात कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहोत. विरोधी पक्ष म्हणून आपण सहकार्य करा." असे मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना सांगितले. यावर भाजप सरकारच्या पाठीशी राहील असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.