CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ विस्तार उद्या करण्याची शक्यता; पाहा कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?
या शपथविधीसाठी देशभरातील अनेक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास उद्या (मंगळवार, 24 डिसेंबर 2019) मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या राजकीय स्थित्यांतरणानंतर अत्यंत नाट्यपूर्ण रित्या महाराष्ट्रात शिवेसना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), राष्ट्रीय काँग्रेस (National Congress) असे महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेत आले. हे सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार (CM Uddhav Thackeray Cabinet Expansion) कधी करणार याबाबत राजकीय वर्तुळासह राज्यातील जनतेलाही उत्सुकता होती. अखेर हा विस्तार उद्या होणार असून, ठाकरे सरकार (Thackeray Sarkar) अधिक गतिमान होणार असल्याचे समजते.
राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नुकतेच पार पडले. एकूण सहा दिवस चाललेल्या या मंत्रिमंडळाला राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांच्या सहाय्याने सामोरे गेले. आता अधिवेशन संपले असून मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या विस्तारात शिवसेना - 13 मंत्री (कॅबिनेट 10, राज्यमंत्री 3), राष्ट्रवादी- 13 मंत्री (कॅबिनेट 10, राज्यमंत्री 3), काँग्रेस-10 मंत्री (कॅबिनेट 8, राज्यमंत्री 2) मंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडलेल्या शपथविधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस- जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी देशभरातील अनेक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळ विस्तार: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' चेहऱ्यांना मिळू शकते संधी)
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी पक्षांमध्ये सत्तावाटपाचे सूत्र नक्की झाले असले तरी, या तिन्ही पक्षांच्या कोणकोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांतील विविध संभाव्य नेत्यांची नावे चर्चिली जात आहेत. दुसऱ्या बाजूला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या नेतृत्वाकडे मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केल्याचीही चर्चा आहे.