Tauktae Cyclone: मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा; प्रशासनाला परिस्थिती मूळ पदावर आणण्याबाबत सूचना

असे असले तरी अद्यापही सावधगिरी बाळगण्याची आणि मदतकार्य करण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे मदतकार्य वेगाने सुरु करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या नुकसानीचा आज (17 मे) आढावा घेतला. या वेळी तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone ) निर्माण झालेल्या नुकसानीची त्वरीत पाहणी करुन त्याचे पंचनामे करावेत. तसेच, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करुन परिस्थिती शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर आणावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तौक्ते चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. असे असले तरी अद्यापही सावधगिरी बाळगण्याची आणि मदतकार्य करण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे मदतकार्य वेगाने सुरु करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्याने आतापर्यंत 6 जणांचे मृत्यू तर 9 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वादळाबाबत माहिती मिळातच संभाव्य धोका टाळण्यासाठी किनारपट्टी आणि वादळाचा फटका बसू शकतो अशा परिसरातील सुमारे 12,500 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. शक्य तितकी काळजी घेण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही इमारतींनाही फटका बसला आहे. (हेही वाचा, Cyclone Tauktae: मुंबईच्या अरबी समुद्रात 2 मोठी जहाज भरकटली; एकावर 273 तर, दुसऱ्यावर 137 जण असल्याची माहिती)

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर पडलेली झाडे दूर करुन वाहतूक पूर्ववत करावी. तसेच, ज्या ठिकाणी विद्यूत खांब कोसळले आहेत अशा ठिकाणी हे खांब पुन्हा उभा करुन विद्यूत पूरवठा पूर्ववत करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. काही ठिकाणी मच्छिमारांच्या बोटींचे नुकसान झाल्याचे वृत्त होते याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन मार्गदर्शन केले.

प्रामुख्याने तोक्ते चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात आणि मुंबई तसेच, ठाणे, नवी मुंबईच्या काही ठिकाणी बसला. या वादळाचा परिणाम कालपासूनच किनाऱ्यावरील जिल्ह्यांना जाणवत होता. हे वादळ जसजसे किनाऱ्याच्या दिशेने येत होते तसतसे वारे वेगाने वाहात होते. हळूहळू वाऱ्याने वेग धरला आणि सोबत मुसळधार पाऊसही सुरु झाला. दरम्यान, मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि सरकारचा अदिदक्षता विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होता.