CM Eknath Shinde's Ganpati Celebrations: 'पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान'; Elvish Yadav ला गणेशोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल Jitendra Awhad यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

‘हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.’

एल्विश यादव आणि जितेंद्र आव्हाड (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील गणपती आरती आणि उत्सवाचे आयोजन केले होते. शहनाज गिल, एल्विश यादव, अवनीत कौर आणि रश्मी देसाई यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींना या सेलिब्रेशनसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सलमान खान, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, शिल्पा शेट्टी, पंकज त्रिपाठी आणि पूजा हेगडे या दिग्गज कलाकारांनीही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

आता या उत्सवामधील एल्विश यादवच्या उपस्थितीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गणेशोत्सवासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी यूट्यूबर एल्विश यादव याला निमंत्रित केल्याबद्दल फटकारले. मुख्यमंत्र्यांच्या घरी यादव याची उपस्थिती हा पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान असल्याचे आव्हाड म्हणाले. महिलांवरील वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला यादव हा रविवारी रात्री सीएम शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती पूजेला उपस्थित राहिलेल्या अनेक सेलिब्रिटींमध्ये सहभागी होता.

याबाबत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सरला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी, गणेश आरतीसाठी बोलवत असतील, तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत. याच्या मते, स्त्रियांना मेंदू कमी असतो, बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते. तिने तेवढंच करावं.’ (हेही वाचा: भाजप नेते Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीने केली 50 लाखांची मागणी)

आव्हाड पुढे म्हणतात. ‘हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.’