CM Eknath Shinde Assam Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 39 आमदारांसह पुन्हा जाणार आसामला; जाणून घ्या काय आहे प्रयोजन

नंतर त्यांनी भाजपसोबत युती करून जुलैमध्ये सत्ता काबीज केली.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व काही आमदार आधी गुजरात व नंतर आसामला (Assam) गेले. आसाममध्येच महाविकास आघाडी सरकार पाडण्याची डाळ शिजली व पुढे तिथूनच सत्तेची सूत्रे हलली. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 39 आमदार पुन्हा एकदा आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतरची ही त्यांची पहिलीच आसाम भेट आहे.

यापूर्वी उद्धव सरकारमध्ये बंडखोरी करून एकनाथ आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीमध्ये आश्रय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे 39 आमदार गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केल्याबद्दल ते देवीपुढे माथा टेकवतील. शिंदे कॅम्पच्या एका पदाधिकाऱ्याने या गोष्टीला शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपूर्वी हाती घेतलेली वचन पूर्ती’ असे म्हटले आहे.

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी या वर्षी जूनमध्ये गुवाहाटीत तळ ठोकला होता. नंतर त्यांनी भाजपसोबत युती करून जुलैमध्ये सत्ता काबीज केली. (हेही वाचा: Abdul Sattar यांच्या Supriya Sule बाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर NCP चं शिष्टमंडळ Governor Bhagat Singh Koshyari यांच्या भेटीला; अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी)

गुवाहाटीनंतर आमदार अयोध्येतील राम मंदिरालाही भेट देणार असल्याचे शिंदे छावणीतील सूत्रांनी सांगितले, मात्र अयोध्या भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही. व्यवस्था तपासण्यासाठी आणि मुख्यमंत्री आणि आमदारांसाठी प्रवास कार्यक्रम तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम गुवाहाटीमध्ये आधीच रवाना झाली आहे. आमदारांचे कुटुंबीयही यात्रेला जाण्याची शक्यता आहे. शिंदे हे आसामचे राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी आणि आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांची भेट घेणार आहेत.