महाराष्ट्रात 5वी ते 8 वीचे वर्ग आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच पुन्हा सुरू करणार: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन आता शिक्षण विभागाने 9 वी ते 12 वी चे वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

School Children (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोविड 19 मुळे विस्कटलेलं यंदाचं शैक्षणिक वर्ष अद्याप सुरळीत झालेलं नाही. राज्यात काही ठिकाणी 9 वी ते 12 वीचे वर्ग काही प्रमानात सुरू झाल्यानंतर आता 5 वी ते 8 वीचे वर्ग कधी सुरू होणार? असा प्रश्न पालकांना, विद्यार्थ्यांना पडला आहे. परंतू शालेय विभागाकडेही त्याचं ठाम उत्तर अद्याप नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad) यांनी आज मीडीयाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्रात पाचवी ते आठवीचे वर्ग पुन्हा करण्याला आरोग्य विभागाकडून (Health  Department) कंदील मिळाला की मगच ते सुरू होतील' असे सांगितले आहे.

दरम्यान कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन आता शिक्षण विभागाने 9 वी ते 12 वी चे वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रात मार्च 2020 पासून शाळा, कॉलेज बंद आहेत. SSC, HSC Exam 2021: कोरोना महामारीमुळे 'या' महिन्यात दहावी, बारावीची परिक्षा घेण्याचा विचार सुरु.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहारांमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत परिस्थितीचा आढावा आरोग्य विभागाशी बोलून घेतला जाणार आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर तो निर्णय कळवला जाणार असल्याची माहिती देखील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी पुरेशी खबर्दारी घेतली जात आहे. पालक, शिक्षक आणि स्थानिक संस्थांसोबत बोलणी सुरू आहे. शिक्षक, शिक्षकेतर विभाग यांच्या RT PCR टेस्ट केल्या जात आहेत.

महाराष्ट्रामध्ये 25 जिल्ह्यांत 9-12वी चे वर्ग सुरू झाले आहेत. यामध्ये सुरूवातीला विद्यार्थी संख्या 3 लाख होती मात्र आठ्वड्याभरात यामध्ये वाढ झाली असून आता 5 लाख विद्यार्थी पुन्हा शाळेत परतले असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत 4026 कोरोना बाधीत रुग्णांची मागील 24 तासांत वाढ झाली व 6365 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 1737080 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73374 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.42% झाले आहे.