CIDCO Housing Scheme 2026 Lottery Draw Date: सिडको ऑगस्ट 2026 गृहनिर्माण योजनेतील बुकिंग प्रक्रिया संपली; आता निकाल कधी?
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 4779 सदनिकांसाठीची बुकिंग प्रक्रिया ३ सप्टेंबर रोजी रात्री संपली असून, आता अर्जदारांचे लक्ष संगणकीय सोडतीच्या तारखेकडे लागले आहे. सिडकोकडून अद्याप सोडतीची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
सिडकोच्या (CIDCO) 'माय प्रिफर्ड सिडको होम' (My Preferred CIDCO HOME)
या ऑगस्ट 2026 गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील सदनिकांसाठीची नोंदणी व बुकिंग प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. बुकिंग विंडो 3 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजता बंद झाली असून, आता पात्र अर्जदारांना संगणकीय सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सिडको होम्स या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली होती. या कालावधीत अर्जदारांना उपलब्ध घरांच्या यादीतून 15 पसंतीक्रम निवडण्याची संधी देण्यात आली होती.
'माय प्रिफर्ड सिडको होम' योजनेतील घरांचा तपशील
'माय प्रिफर्ड सिडको होम' या योजनेत एकूण 4779 वन बीएचके घरं उपलब्ध असून, त्यापैकी सर्वाधिक 4229 घरं तळोजा सेक्टर 39 येथे आहेत. उर्वरित सदनिकांपैकी 293 सदनिका खारघर बस डेपो परिसरात तर 257 सदनिका कळंबोली बस डेपो परिसरात उभारण्यात आल्या आहेत. घरांच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास, तळोजा येथील सदनिकांची किंमत अंदाजे 23.50 लाख रुपयांपासून सुरू होते, तर कळंबोली येथील सदनिकांसाठी ही किंमत 37.70 लाख रुपयांपर्यंत आणि खारघर येथील सदनिकांसाठी 43.50 लाख रुपयांपर्यंत जाते. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्जदारांना बुकिंगसाठी 75 हजार रुपये भरावे लागले होते.
पात्रता निकष काय होते
महाराष्ट्रातील रहिवासी असलेले आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असलेले अर्जदार ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी पात्र मानले जातात. याशिवाय अर्जदाराच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसणे ही देखील एक प्रमुख अट होती.
सिडको च्या 4779 घरांसाठी सोडत कधी होणार?
सिडकोने यापूर्वी स्पष्ट केले होते की, बुकिंग विंडो बंद झाल्यानंतर या योजनेची संगणकीय सोडत घेतली जाईल. मात्र आतापर्यंत सोडतीची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या डिसेंबर 2025 योजनेतील अनुभव पाहता, प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक पडताळणीसाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असे संकेत मिळतात. त्यावेळीही बुकिंग बंद झाल्यानंतर सोडतीचा निकाल येण्यास काही महिन्यांचा विलंब झाला होता.
अर्जदारांनी अद्ययावत माहितीसाठी सिडको होम्स या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी, तसेच सिडकोकडून पाठवण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोडतीनंतरची प्रक्रिया
संगणकीय सोडतीत नाव आल्यानंतरही अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी आणि पात्रता तपासणी या टप्प्यांतून जावे लागणार आहे. यानंतर संबंधित अर्जदारांना पहिली सूचना पत्र (फर्स्ट इंटिमेशन लेटर) पाठवले जाईल, त्यानंतर तात्पुरते वाटप पत्र (प्रोव्हिजनल ऑफर लेटर) दिले जाईल. निर्धारित मुदतीत घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच अंतिम ताबा दिला जाईल. सोडतीत निवड होणे म्हणजे अंतिम वाटप निश्चित झाले असे नाही, हे अर्जदारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ज्या अर्जदारांना सोडतीत यश मिळणार नाही, त्यांना भरलेली बुकिंग रक्कम स्वयंचलितपणे परत केली जाईल, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.