Vasant More: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन;  मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे जाणार कोठे? 'मातोश्री' की 'शिवतीर्थ'?

वसंत मोरे यांना अनेक पक्षांनी ऑफर दिली आहे. स्वत: वसंत मोरे यांनीही याबाबत पुष्टी केली आहे. वसंत मोरे यांना पक्षात येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप या जवळपास सर्वच पक्षांनी ऑफर दिली आहे.

Vasant More | (Photo Credits: Facebook)

वसंत मोरे (Vasant More) यांची पुणे मनसे (MNS) शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहे. वसंत मोरे यांना अनेक पक्षांनी ऑफर दिली आहे. स्वत: वसंत मोरे यांनीही याबाबत पुष्टी केली आहे. वसंत मोरे यांना पक्षात येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप या जवळपास सर्वच पक्षांनी ऑफर दिली आहे. वसंत मोरे यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे वसंत मोहे हे मुंबईत शिवतीर्थ येथे जाणार की मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार याबाबत उत्सुकता आहे.

स्वत: वसंत मोरे यांनी म्हटले की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. मात्र, त्या वेळी मी कात्रजमध्ये नव्हतो. त्यामुळे त्यांच्याशी माझे थेट बोलणे होऊ शकले नाही. त्यानंतर मला पुणे मनसे शहरप्रमुख संजय मोरे यांचा फोन आला. त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दल सांगितले. त्यांनी मला मुंबईला भेटण्यासाठीही बोलावले आहे असे मोरे यांनी म्हटले. (हेही वाचा, Vasant More: तात्या अजूनही ठामच! राज ठाकरे काय भूमिका घेणार?)

मोरे यांनी पुढे म्हटले की, मी राज ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली आहे. त्यासाठी मी त्यांना मेसेजही केला आहे. पण अद्याप तरी त्यांचा मला कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नाही. आजवर मी मेसेज केला आहे आणि त्यांचा रिप्लाय आला नाही असे कधीच झाले नाही. त्यामुळे साहेब काहीसे नाराज असल्यासारखे वाटते आहे. पण त्यांची नेमकी नाराजी काय आहे हे मात्र मला समजू शकले नाही. काही असले तरी ती मला समजू शकली नाही.