Maharashtra Unlock: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इशारा, 'महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आताच खबरदारी घ्या'
आपण सर्वांनीच कोरोना नियमांचे पालण करणे आवश्यक आहे. आपण नियमांचे पालन केले तरच कोरोनाला आपण पराभूत करु शकतो. आता लसीकरणानेही राज्यात वेग घेतला आहे.
कोरोना (Coronavirus) निर्बंध आणि लॉकडाऊन (Lockdown) नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने आजपासून (15 ऑगस्ट) मोठ्या प्रमाणावर शिथिलता (Maharashtra Unlock) दिली आहे. दरम्यान, 'निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी काळजी घ्या. पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही यासाठी आतापासूनच खबरदारी घ्या' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय येथे ध्वजारोहण झाले. या वेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी हा इशारा दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आपण सर्वांनी निश्चय करायला पाहिजे की, पुढचा स्वातंत्र्य दिन हा कोरोनामुक्त आणि भयमुक्त करायला करु. आपण सर्वांनीच कोरोना नियमांचे पालण करणे आवश्यक आहे. आपण नियमांचे पालन केले तरच कोरोनाला आपण पराभूत करु शकतो. आता लसीकरणानेही राज्यात वेग घेतला आहे. काल (14 ऑगस्ट) दिवसभरात राज्यात नऊ लाख लोकांचे कोरोना लसीकरण झाले. राज्यातील लसीकरणात आतापर्यंत आपण गाठलेला हा सर्वोच्च टप्पा आहे. मी माझं राज्य आणि देश कोरोना मुक्त करणारच, असा निर्धार आपण सर्वांनी करायला हवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Unlock: मुंबई लोकल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानदारांना मोठा दिलासा, राज्यात आजपासून काय सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोरोना संक्रमितांची संख्या कमी होत असली तरी अद्यापही संकट संपले नाही. कोरोनाचा कहर आपण सर्वांनीच अनुभवला आहे. अद्यापही संकट कायम आहे. आपण आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवतो आहोत. ऑक्सिजनचा पुरवठा करतो आहोत. ऑक्सिजनचा पुरवठा पाहूनच आपण शिथिलता देत आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ट्विट
दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझे वंदन. स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ हुतात्म्यांनी समजून सांगितला. या सर्वांचा मला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकांनी सन्मानीत करण्यात आले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.