मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला बलात्कार प्रकरणातील नवा अहवाल; आरोपींना 100 दिवसांत फाशी देण्याची अहवालात असणार तरतूद

तसेच प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाची दखल घेतली आहे व याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter /ANI)

आंध्र प्रदेश सरकारने नुकताच रेप करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी एक नवा कायदा केला आहे. या कायद्यानुसार बलात्कारात आरोपींना 21 दिवसांत फाशी देण्यात येणार आहे. याच कायद्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही हा कायदा करण्यात यावा असा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मांडला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाची दखल घेतली आहे व याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे.

बलात्कारासंबंधी आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू होऊ शकतो या बाबत अहवाल आणि मसुदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “देशात बलात्काराचं प्रमाण वाढत चाललं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि या सगळ्यामुळे देशात वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येक राज्यात हा कठोर कायदा लागू झाला पाहिजे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना हा कडक कायदा अंमलात आणावा अशी मागणी केली आहे”.

दरम्यान, आंध्र प्रदेश राज्यात लागू करण्यात आलेल्या दिशा कायद्यांतर्गत बलात्कासारख्या गंभीर गुन्ह्यात कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा नव्याने लागू केलेला कायदा असून, बलात्कार या गुन्ह्याचा तपास पोलिसांना सात दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. तसेच त्यासंबंधित खटला 14 दिवसात संपवावा लागणार आहे आणि बलात्कार झाल्यापासून तब्बल 21 दिवसात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या नव्या कायद्यामध्ये आहे.