मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटप एक-दोन दिवसांत जाहीर करु: उद्धव ठाकरे
याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता कोणी कार्यक्रमास उपस्थित राहीले नाही म्हणून लगेच नाराज झाले, असे होत नाही. त्यामुळे तसा अर्थ काढू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार झाला. पक्षनिहाय खातेवाटप झाले. एकदोन दिवसांमध्ये खातेवाटप जाहीर करु, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपल्याला मंत्रिपद मिळावे ही सर्वांची अपेक्षा असू शकते. यात काही गैर नाही. अनेक इच्छुकांपैकी काहींनाच संधी देता येते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी असू शकते, असे सांगतानाच शपथविधीवरुन कोणी वाद निर्माण करु नये, असेही ठाकरे यांनी या वेळी म्हटले.
शपथविधी कार्यक्रमास शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत अनुपस्थित होते. याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता कोणी कार्यक्रमास उपस्थित राहीले नाही म्हणून लगेच नाराज झाले, असे होत नाही. त्यामुळे तसा अर्थ काढू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, राज्यपालांनी काही मंत्र्यांना दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सांगितले. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे का? याबाबत विचारले असता, राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात कोणताही संघर्ष नाही. मंत्रिपदाची शपथ ठरल्या प्रमाणेच घेतली जावी याबात राज्यपालांनी संबंधित मंत्र्यांना या आधीच बजावले होते. त्यामुळे शपथ घेताना कोणत्याही मंत्र्यांनी शपथेच्या मजकूराशिवाय काही उच्चारु नये अशी राज्यपालांची इच्छा होती. पण, शपथ घेताना आपल्या दैवतांचे, आई वडीलांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. उत्साहाच्या भरात काही मंत्र्यांकडून तसे घडले. ही बाब राज्यपालांनी संबंधितांच्या ध्यानात आणून दिली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये नाराजीनाट्य; मित्रपक्षांचाही रुसवा कायम)
उद्धव ठाकरे यांनी या वेळी शेतकरी कर्जमाफी, नियमीत कर्जाचे हापते भरणाऱ्या आणि कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक नवी कर्जमाफी योजना लवकरच आणणार असल्याचेही ठाकरे या वेळी म्हणाले. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी या वेळी केला. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोणते खाते कोणत्या मंत्र्याकडे असेल याबाबत उत्सुकता आहे.