Marathi Bhasha Din 2021 निमित्त 'मी मराठी, माझी मराठी' बाणा जपण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मराठी भाषा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आज 27 फेब्रुवारी कवीवर्य कुसुमाग्रजांची जयंती आणि त्या निमित्ताने साजरा होणारा 'मराठी भाषा दिन' (Marathi Bhasha Din) किंवा 'मराठी भाषा गौरव दिन'. मराठी भाषा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन करत मराठीचा वापर वाढवण्याचे आणि 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपण्याचे आवाहनही केले आहे. विशेष म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त दिली आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या! असे आवाहन केले आहे. तसंच "मराठीत विचार करूया, मराठीत बोलूया, व्यक्त होऊया असं आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवूया," असेही त्यांनी सांगितले. (पुढच्या 'मराठी भाषा गौरव दिना'पर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संदेश:
दरम्यान, मराठी भाषादिनानिमित्त पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच, असा निश्चियही त्यांनी केला. त्याचबरोबर "तुम्ही आम्हाला जे काही देऊन गेलात ते आम्ही वाढवू शकलो नाही तरी नक्की जपूच," अशी भावनाही त्यांनी कुसुमाग्रजांना वंदन करताना व्यक्त केली.