जाणून घ्या म्हाडाची घरे मिळवण्याची नक्की काय आहे प्रक्रिया, कोण होऊ शकते या लॉटरीमध्ये सहभागी
10 डिसेंबर, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता
एकीकडे मुंबईमधील घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना, दुसरीकडे Maharashtra Housing and Area Development Authority म्हणजेच म्हाडा (MHADA), तुमचे मुंबईमधील घराचे स्वप्न करू शकते. म्हाडाच्या घरांची लॉटरी काढली जाते, त्याद्वारे अतिशय कमी किमतीमध्ये तुम्ही ही घरे मुंबईसारख्या ठिकाणी विकत घेऊ शकता. म्हणूनच मुंबईकर आतुरतेने या लॉटरीची वाट पाहत असतात. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारकडून जनतेसाठी हे दिवाळी गिफ्ट असणार आहे, कारण यावेळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 1300 पेक्षा जास्त घरांसाठीची लॉटरी काढली जाणार आहे.
यंदा म्हाडाने 25 ते 30 टक्क्यांनी घरांच्या किंमती कमी केल्या आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचे स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर घ्यायचे असेल तर ही खूप चांगली संधी आहे. चला तर पाहूया या लॉटरीमध्ये सामील होण्यासाठीची नक्की प्रक्रिया काय आहे.
म्हाडाच्या घरांसाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज भरता येणार आहेत. 10 डिसेंबर, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता, 1384 घरांसाठी सोडत निघणार आहे.
पात्रता –
> अर्जदाराचे वय किमान 18 वर्षांचे असावे.
> अर्जदाराकडे डोमिसील सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे कमीत कमी 15 वर्षे वास्तव्य महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
> तुमच्याकडे तुमचा इनकम प्रुफ आणि पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
प्रक्रिया -
> सर्वप्रथम म्हाडा लॉटरी स्कीमच्या वेबसाईटवर लॉग ऑन करा.
> सर्वप्रथम तुम्हाला तुमचे युजरनेम तयार करावे लागे, त्यासाठी तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन करा. यावेळी तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती इथे भरावी लागेल जसे की, नाव, कौटुंबिक उत्पन्न, पॅनकार्ड नंबर, जन्मतारीख, व्यवसाय, वैवाहिक स्थिती, लिंग, निवासी पत्ता, स्वत: चा मोबाइल नंबर इ.
> आपल्याद्वारे देण्यात येणार मोबाइल नंबर हा कार्यरत स्थितीत आहे हे सुनिश्चित करा, कारण पुढील प्रक्रियेसाठी याच नंबरचा वापर होणार आहे.
> एकदा का तुमचे युजरनेम तयार झाले, तुम्ही ऑनलाईन लॉगइन करून, म्हाडाच्या विविध स्कीम्स पाहू शकता. तुम्ही म्हाडा लॉटरी हा पर्याय निवडून, तुमचे स्थळ निश्चित करा.
> त्यानंतर तुमचे सध्याचे उत्पन्न लिहा, आणि तुमच्या बँकेची इतर माहिती द्या.
> ही सर्व माहिती दिल्यानंतर पुन्हा एकदा तपासून कन्फर्म करा.
> यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची फी भरावी लागेल. ही फी तुमची ऑनलाईन अथवा DDने भरू शकता.
मागील काही काळात म्हाडाच्या घरांच्या किमतीही बऱ्याच वाढल्या होत्या, त्यामुळे ही घरे विकली गेली नव्हती. म्हाडाची न विकली गेलेली 918 घरे औरंगाबादेत, 1150 घरे नाशिकमध्ये तर 376 घरे नागपुरमध्ये आहेत, अशी आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे आता म्हाडाच्या 2441 घरांवर 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या उदय सामंत यांनी ऑक्टोबरमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते.
यावेळी मुंबईमधील म्हाडाचे सर्वात महाग घर हे ग्रँट रोड येथील असून त्याची किंमत 5 कोटी 80 लाख आहे. तर सर्वात स्वस्त घरांची किंमत 14 लाख 62 हजार ठरविण्यात आली आहे.