IPL Auction 2025 Live

'सामना' च्या भाषेबाबत चंद्रकांत पाटील यांनी अखेर संपादिका रश्मी ठाकरे यांना लिहिले पत्र, काय लिहिलय त्या पत्रात?

जर आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना या पत्राच्या माध्यमातून लगावला आहे.

Chandrakant Patil and Rashmi Thackeray (Photo Credits: Facebook/ Wikimedia Commons)

दैनिक सामना (Saamana) वृत्तपत्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अनेकदा गलिच्छ भाषेत टीका केली आहे. यामुळे आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी याआधी सांगितले होते. त्यानुसार त्यांना आज रश्मी ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. सामना वृत्तपत्रात वापरल्या जाणा-या गलिच्छ भाषेचा चंद्रकांत पाटील यांनी निषेध केला असून याबाबत रश्मी ठाकरे यांनी काही भूमिका मांडावी असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच जर आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना या पत्राच्या माध्यमातून लगावला आहे.

"वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या , त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल." असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.हेदेखील वाचा- 'सामना' च्या अग्रलेखातील भाषेबाबत वृत्तपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

"आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा," असेही चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.

काय होतं प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटिस आल्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. यादरम्यान भाजप नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून जहरी टिका करण्यात आली होती. यात चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत टिका केली होती.