Chandani Chowk Flyover: पुण्यात चांदणी चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

या पुलासाठी 17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे

Pune Chandani Chouck

पुणे शहरातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या उद्घाटन समारंभाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. (हेही वाचा - Ajit Pawar Metro Ride: रुबी हॉल ते वनाझ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवास; प्रवाशांकडूनही घेतला फीडबॅक (Watch Video))

पुण्यातील चांदणी चौक पुलावरुन दिवसाला जवळपास दीड लाख वाहने या उड्डाणपुलावरून सुसाट धावू शकतील. या पुलासाठी 17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढील 50 वर्षाचा विचार करुन बांधण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पुण्यात सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती.

ऑगस्ट 2017 मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पण काही कारणास्तव हे काम रखडले होते. 2019 मध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला होता. भूमिपुजनानंतर तब्बल 6 वर्षांनी हे काम पुर्णत्वास जात असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे.