मध्य रेल्वे वर 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक

मध्य रेल्वेवर आज, 18 ऑक्टोबर व उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी दिवा-कल्याण (Diva- Kalyan) मार्गावर हा ब्लॉक घेऊन डोंबिवली (Dombivali) स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल पाडण्याचे काम पार पडणार आहे.

Megablock (Photo Credits:Twitter)

दर रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉक (Megablock)पासून यावेळेस मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना सुटका मिळणार आहे. या आठ्वड्यात तांत्रिक कामानिमित्त घेण्यात येणारा ब्लॉक हा रविवार ऐवजी आज, 18 ऑक्टोबर व उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या आठवड्यात रात्रकालीन ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे.  दिवा-कल्याण (Diva- Kalyan) मार्गावर हा ब्लॉक घेऊन डोंबिवली (Dombivali) स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल पाडण्याचे काम पार पडणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दिवा-कल्याण स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 1.10 ते 3.30 पर्यंत तसेच उद्या 19 ऑक्टोबर रोजी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री 1 ते पहाटे 5  दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 20 ते 25 मिनिटे उशिराने लोकल उपलब्ध असतील. तसेच कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

दरम्यान, या आठवड्यात 14 ऑक्टोबर रोजी टिटवाळा स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती, मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खोळंबल्याने सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.