कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेच्या (Central Railway) समस्यांनी करावी लागतेय. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. कामावर जाण्याच्या वेळेतच नेमका हा घोळ झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. ब-याच धीम्या रेल्वे गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणा-या आणि कर्जतच्या दिशेने जाणा-या लोकलचा खोळंबा झाला. लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्याने बदलापूर, अंबरनाथ, कल्याण. डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून डोंबिवली वरुन विशेष रेल्वेसेवा करण्यात आली आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होण्यास अजून काही अवधी लागू शकतो असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळची वेळ म्हणजे नोकरीसाठी बाहेर पडलेल्या लोकांची. आणि नेमका त्याच वेळेस हा मध्य रेल्वेचा घोळ झाल्याने मुंबईकर हैराण झाले आहे. या फलाटावरून त्या फलाटाकडे धीम्या आणि जलद गतीच्या गाड्यांसाठी प्रवाशांना धावपळ करावी लागतेय.

हेही वाचा: ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान रुळाला तडे, मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

मुंबईत अजून म्हणावी तशी पावसाला सुरुवात झाली देखील नाही त्याच्या आधीच मध्य रेल्वेने मान टाकल्यामुळे पावसाचा जोर वाढला तर प्रवाशांचे अजून काय हालत होईल ते येणा-या काही दिवसांत कळेल.