Buldhana Bhendwal Bhavishyavani: यंदाची भेंडवळ भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पाऊस, पीक पाणी ते राजकीय, आर्थिक संकटाचे काय आहेत अंदाज?

Buldhana Bhendwal Bhavishyavani | Image Used for Representational Purpose| Photo Credits: Pixabay.com

Bhendwal Bhavishyavani 2020:  दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणार्‍या भेंडवळ भविष्यवर (Bhendwal Bhavishyavani) राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्‍यांचेही लक्ष असते. पण यंदा लॉकडाऊनमुळे 350 वर्षांच्या या परंपरेला छेद गेला आहे. यंदा अवघ्या 4-5 जणांच्या उपस्थितीमध्ये भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा करण्यात आली. यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, महापुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. देशाचा राजा कायम राहील अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान पीक-पाणी, पाऊसमान याचा वेध घेण्यासाठी बुलढाणा आणि आजुबाजूच्या गावातील मंडळी भेंडवळ भविष्यवाणी ऐकायला, पहायला तोबा गर्दी करतात.

भेंडवळ भविष्यवाणी 2020-21 चा अंदाज

यंदा काल (26 एप्रिल) अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी भेंडवळ येथे घट मांडणी करून आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार यंदाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्यभरातील बळीराजा या भेंडवळीचं भविष्य जाणून घेऊन आगामी पेरणी करतो.

दरवर्षी अक्षयतृतीयेच्या सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतामध्ये वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. या घटामध्ये 18 धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा यांची विशिष्ट स्वरूपात मांडणी करतात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा खणून त्यामध्ये पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवतात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणी करण्याची या गावातील प्रथा आहे.

दुसर्‍या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरुन भविष्य जाहीर केले जाते. पुरी हे पृथ्वीचं, घागर हे समुद्राचं प्रतिक असतं. तर त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांची मांडणी असते. घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन आगामी वर्षासाठी भाकित सांगण्याची जुनी परंपरा आहे.