Supriya Sule On Deteriorating Air Quality In Pune: पुण्यात श्वास घेताना दिवसातून 3-4 सिगारेट ओढल्यासारखे वाटते; सुप्रिया सुळेंनी पुण्यातील हवेच्या दर्जाबाबत व्यक्त केली चिंता
मुंबईच्या प्रदूषणावर चर्चा होऊन धोरणकर्त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. हे सरकार प्रदूषणावर चर्चा करत नाही. हे असंवेदनशील आणि बनावट सरकार आहे. ते फक्त घरे फोडू शकतात, पार्टी तोडू शकतात, अशी जहरी टीकाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.
Supriya Sule On Deteriorating Air Quality In Pune: पुणे दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रविवारी सकाळी पुण्यात आल्यानंतर शहरातील हवेच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावरील अत्यंत प्रदूषित हवेच्या गुणवत्तेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी पुण्यात श्वास घेताना दिवसातून 3-4 सिगारेट ओढल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्यांच्या पोस्टमध्ये, सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, 'मुंबईहून नुकतेच पुण्यात आले. पुण्यात हवेची गुणवत्ता ही गंभीर चिंतेची बाब आहे. या प्रदूषित हवेचा श्वास घेणे म्हणजे दिवसातून 3-4 सिगारेट ओढल्यासारखे वाटते! नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः मुले आणि वृद्धांना धोका आहे.'
या गंभीर समस्येवर त्वरीत कारवाईची मागणी करत, सुळे यांनी सीएमओ महाराष्ट्राच्या अधिकृत X खात्याला टॅग केले आणि लिहिले, या समस्येचा सामना करण्यासाठी आम्हाला सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांकडून त्वरित कारवाईची आवश्यकता आहे. सुळे यांनी मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याबद्दल शिंदे सरकारवर टीका केली. (हेही वाचा - Mumbai AQI: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; BMC सक्रीय, प्रदुषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु)
सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मुंबईतील हवेची घसरलेली गुणवत्ता आणि शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील वाढत्या प्रदूषणाकडे सध्याचे सरकार लक्ष देत नाही. मुंबईच्या प्रदूषणावर चर्चा होऊन धोरणकर्त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. हे सरकार प्रदूषणावर चर्चा करत नाही. हे असंवेदनशील आणि बनावट सरकार आहे. ते फक्त घरे फोडू शकतात, पार्टी तोडू शकतात, अशी जहरी टीकाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.
माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे यूबीटी नेते अरविंद सावंत यांनीही वाढत्या प्रदूषणावरून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे जी यांनी '#मुंबईच्या फुफ्फुसांचे' आरे जंगलाचे रक्षण केले. तुम्ही मुंबईच्या फुफ्फुसावर हल्ला करत आहात! मुंबईच्या प्रदूषणाला केवळ बीएमसीच नाही तर सरकारही तितकेच जबाबदार आहे!' असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.