अहमदनगर: लष्कराचा बॉम्ब घरी घेऊन गेले, झाला स्फोट; दोघे जागीच ठार
या बॉम्बमधील शिसं काढून त्याची विक्री करण्याचा मोठा व्यवसाय परिसरातील लोक गेली अनेक वर्षे करतात. निकामी बॉम्बमधील शिसं काढून ते भंगारात विकने आणि पैसे कमावने असा येथील काही लोकांच्या चरितार्थाचा भाग बनला आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नगर (Nagar Taluka) तालुक्यातील खारे कर्जुने शिवारात रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. य घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊसाहेब धिरोडे (वय 32 ) अशी मृतांची नावे असून, दोघेही खारेकर्जुने, तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहेत. लष्कराने केलेल्या युद्धसरावादरम्यान मैदानावर पडलेला बॉम्ब हे दोघे घरी घेऊन गेले होते. या बॉम्बमधील शिसं काढत असताना झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात असलेल्या खारेकर्जुने गाव परिसराजवळ भारतीय लष्कराचा के. के. रेंज हा युद्ध प्रात्यक्षिक परिसर आहे. या परिसरात लष्कराचे जवान युद्धसराव करत असतात. दरम्यान, या वेळी काही शस्त्रास्त्रे आणि बॉम्बचाही वापर केला जातो.
लष्कराच्या सरावादरम्यान वापरुन निकामी करण्यात आलेले बॉम्ब परिसरातील गावकरी घरी घेऊन जातात. या बॉम्बमधील शिसं काढून त्याची विक्री करण्याचा मोठा व्यवसाय परिसरातील लोक गेली अनेक वर्षे करतात. निकामी बॉम्बमधील शिसं काढून ते भंगारात विकने आणि पैसे कमावने असा येथील काही लोकांच्या चरितार्थाचा भाग बनला आहे. (हेही वाचा, पेण - आपटा बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आपडल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथकाने निकामी केली वस्तू)
घटनेत मृत्यू झालेले अक्षय नवनाथ गायकवाड आणि संदीप भाऊसाहेब धिरोडे हे दोघेही लष्कराच्या सरावादरम्यान परिसरात पडलेले बॉम्ब घरी घेऊन गेले. हे बॉम्ब निकामी केले असतील या समजातून हे दोघे ते घरी घेऊन गेले. दरम्यान, यातील काही बॉम्ब निकामी करण्यात आलेच नव्हते. परिणामी त्याचा स्फोट झाला. या स्फोटात या दोघांच्या (अक्षय नवनाथ गायकवाड आणि संदीप भाऊसाहेब धिरोडे ) शरीराच्या अक्षरश: चिंध्या झाल्या. ज्यात दोघांचा मृत्यू झाला. घरी आणलेल्या बॉम्बमधील शिसे काढताना हा स्फोट झाला.
दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.