कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी BMC करणार 1 लाख Rapid Test Kits ची निर्मिती; झटपट तपासणी करणे होणार शक्य
देशातील 5734 रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 1000 च्या वर रुग्ण आहेत. तसंच ही रुग्णसंख्या दिवसागणित वाढत आहेत. त्यामुळे वाढता धोका कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका Rapid Test Kits ची निर्मिती करणार आहे.
देशात थैमान घालत असणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रभाव महाराष्ट्र राज्यात अधिक प्रमाणात दिसून येत आहे. देशातील 5734 रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 1000 च्या वर रुग्ण आहेत. तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसंच ही रुग्णसंख्या दिवसागणित वाढत आहेत. त्यामुळे वाढता धोका कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 1 लाख Rapid Test Kits ची निर्मिती करणार आहे. या किटमुळे व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे का याची माहिती लगेचच मिळते. मुंबईतील रुग्णसंख्या पाहता बीएमसीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्याप्रमाणे आपण ही टेस्ट करु शकतो. (162 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1297 वर पोहचली)
सध्या कोरोनाची टेस्ट PCR माध्यमातून होत आहे. त्यासाठी नाक आणि घशातील स्वॅब घेऊन टेस्ट केली जाते. त्याचा रिपोर्ट येण्यासाठी तब्बल 5-6 तास लागतात. रॅपिड टेस्ट केवळ रक्ताचे नमुने घेऊन करण्यात येते. तसंच त्याचे रिपोट्स अवघ्या 15 मिनिटांत कळतात. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची माहिती झटपट कळेल आणि त्यांच्यावर उपचार करता येतील. परिणामी रुग्णासह इतरांना असणारा धोका टळेल.
ANI Tweet:
देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापैकी अधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तसंच त्यांच्यात दिवसागणित वाढ होत आहे. त्यामुळे रॅडिप टेस्टसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. तसंच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वरळी कोळीवाडा, धारावी असा दाटीवाटीचा भाग सील करण्यात आला आहे. तसंच कोरोनाचे रुग्ण आढळलेली ठिकाणं, हॉस्पिटल्सही शटडाऊन करण्यात आली आहेत.