BMC चा रात्र कर्फ्यूचा निर्बंध; मंत्री आदित्य ठाकरेंनी दिले लाईट शो पाहण्यासाठी निमंत्रण; लाखोंची झाली गर्दी, 144 ची पायमल्ली
या मार्गदर्शक तत्त्वानुसार, रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती.
सध्या देशात कोरोनाचा (Coronavirus) सर्वात धोकादायक प्रकार ओमायक्रॉनचा (Omicron) प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्रातही या संसर्गाची अनेक प्रकरणे आढळली आहेत. अशात मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात रात्र कर्फ्यू लावला आहे. परंतु नुकतेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी, ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर लोकांना चक्क ‘लाइट शो’ पाहण्यासाठी आमंत्रित केले. त्यांच्या निमंत्रणावरून मुंबईतील लाखो लोक कलम 144 ला झुगारत आणि कोरोना प्रोटोकॉलची पायमल्ली करत रस्त्यावर उतरले होते.
या लाइट शोसाठी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करून, आदित्य ठाकरे यांनी कोरोना प्रोटोकॉल आणि बीएमसीच्या आदेशाची अवहेलना तर केलीच, पण त्यांच्याच सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाही झुगारल्या. पर्यटन मंत्र्यांच्या सांगण्यावरून काल मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन येथील वंडरलँड गार्डनमध्ये लाइट शो पाहण्यासाठी लाखो लोक पोहोचले होते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेले राज्य आहे. राज्यात काल ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 141 झाली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची बिघडणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नव्या व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत रात्री कर्फ्यू जाहीर केला आहे. त्याअंतर्गत रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. नवीन कोरोना मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले होते की, जर कोणी या आदेशांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई केली जाईल. (हेही वाचा: कोविड प्रकरणांचे मूल्यांकन करून पुढील आठवड्यात शाळा, महाविद्यालयीन वर्गांबाबत निर्णय घेण्यात येईल, आदित्य ठाकरेंची माहिती)
25 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जारी करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वापूर्वी महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वानुसार, रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. याशिवाय जिम, स्पा, थिएटर, हॉटेल्स, सिनेमा हॉल यांसारख्या ठिकाणांसाठी 50 टक्के क्षमतेची घोषणा करण्यात आली आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी लोकांना लाईट शो पाहण्यासाठी निमंत्रित करण्याबाबत टीका होत आहे.
दरम्यान, सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात अनुपस्थित आहेत. मंगळवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अशा स्थितीत आदित्य ठाकरे शेवटच्या दिवशीही सभागृहात येणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.