देवेंद्र फडणवीस यांचे आरोप निराधार; कारभार पारदर्शी असल्याचे BMC चे स्पष्टीकरण

मागील बरेच दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा प्रचंड वाढत होता. मात्र काही दिवसांपासून त्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबई (Mumbai) सह राज्यात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट अद्याप कायम आहे. मागील बरेच दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा प्रचंड वाढत होता. मात्र काही दिवसांपासून त्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना शासित बीएमसी (BMC) वर आरोप केले होते. कोरोनाबाधितांचे आकडे आणि मृतांची संख्या यात फेरफार केली जात आहे. तसंच खरी रुग्णवाढ आणि मृतांचे आकडे लपवून सरकार संसर्गाचा वेग कमी झाल्याचे आभासी चित्र निर्माण करत आहे, असे त्यांनी म्हटले होते. परंतु, हे सर्व आरोप बीएमसीने फेटाळून लावले आहेत. (राज्यातील कोविड-19 परिस्थितीवरुन देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पहा काय म्हणाले)

बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले की, "कोरोना रुग्णांची संख्या, मृतांचा आकडा, चाचण्यांचे प्रमाण या सर्व बाबतीत मुंबई महानगरपालिकेचा व्यवहार पारदर्शक आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत आणि बीएमसी ते फेटाळून लावत आहेत." तसंच जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याद्वारे देण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे पालन करुनच कोविड-19 रुग्णांच्या चाचण्या आणि संक्रमित व मृतांच्या आकडेवारीची नोंद केली जात आहे, असंही बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

स्थानिक विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मुंबई प्रशासन आणि राज्य सरकारच्या कारभारावर सातत्याने टीका होत आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. दरम्यान, यावरुनही भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका-टिपण्णी सोडून एकत्रितपणे कोरोना विरुद्ध लढा देऊया, असं म्हटलं आहे.