BMC Elections 2023: दिल्लीत भाजप पराभूत, मुंबईत काय होणार? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा लागणार कस
दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी असली तरी मुंबई ही आर्थिक राजधानी मानली जाते. त्यामुळे आता आगामी काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Election 2023) काय होऊ शकते याबाबत चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या निकालाचा भाजपला मुंबईत फटका बसू शकता याबाबतही चर्चा
दिल्ली महानगरपालिका (MCD Election Results 2023) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) दणदणीत पराभव झाला. तिथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. दिल्ली हे देशातील प्रमुख शहरांपैकी एक शहर आहे. त्यामुळे राजधानीचे ठिकाण असलेल्या या शहराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी असली तरी मुंबई ही आर्थिक राजधानी मानली जाते. त्यामुळे आता आगामी काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections 2023) काय होऊ शकते याबाबत चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या निकालाचा भाजपला मुंबईत फटका बसू शकता याबाबतही चर्चा सुरु आहेत.
मुंबईत सत्ताविरोधी लाट?
दिल्लीमध्ये भाजपची 15 वर्षे सलग सत्ता होती. त्यामुळे सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांना असते ती सत्ताविरोधी (Anti-incumbency) लाटेची भीती भाजपलाही होती. पण, दिल्लीत भाजपविरोधी लाटेपेक्षा लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. मुंबईबाबत बोलायचे तर मुंबईत पाठिमागील जवळपास 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शेवटची काही वर्षे वगळता भाजप शिवसेनेसोबत युतीद्वारे सत्तेत होती. आता इथे गंमत अशी की, दिल्लीत सत्तेतल्या भाजपचा पराभव झाला. मुंंबईत भाजप थेट सत्तेत नव्हती. (हेही वाचा, MCD Election Result 2022: विजय 'आप'लाच, 'झाडू ने केली कमाल, भाजपच्या कमळाचा पत्ता कट; काँग्रेसचा नाही हालला 'हात')
मुंबईत सत्ताविरोधी लाट?
मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता आहे. आता कार्यकाळ संपल्याने आणि प्रशासक असल्याने मुंबई महापालिकेत कोणाचीच सत्ता नाही. मुंबई महापालिकेच्या इतिसाहास दुर्मिळातील दुर्मिळ स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. असे असले तरी मुंबईकरांच्या मनात उद्धव ठाकरे अथवा शिवसेनेच्या विरोधात तसे जनमत वरवर तरी दिसत नाही.
शिवसेना भाजप रस्सीखेच
मुंबई महापालिका निवडणूक 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला. यात शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली असली तरी भाजपनेही मुंबईत आपली ताकद वाढल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भाजपच्या आकांक्षांना धुमारे फुटले. त्या धुमाऱ्यांवरच भाजप मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचे स्वप्न बाळगतो आहे.
एकनाथ शिंदेंमुळे बिघडणार खेळ?
मुंबई शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. असे असले तरी एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. मुंबई शहरात हा हादरा फारसा पाहायला मिळाला नसला तरी सोबतचे आमदार, खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत. सहाजिकच त्याचा शिवसैनिकांवरही परिणाम झाला आहे. स्थानिक पातळीवरही शिवसेना विभागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा उद्धव ठाकरे यांचा गट आणि बाळासाहेबांची शिवसेना हा एकनाथ शिंदे यांचा गट अशी विभागणी आहे. त्यामुळे भाजपच्या आकांक्षा वाढल्या असल्या तरी महाविकासआघाडीचे आव्हान भाजप आणि शिंदे गटापुढे राहणार आहे. त्यामुळे एकूण का"'य तर बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांची ताकद 'झाकली मूठ सव्वा लाखाची' अशीच आहे.
दिल्लीच्या पराभवाच भाजपला फटका?
दिल्ली महानगरपालिकेत भाजपचा पराभव झाला आहे. याचा अर्थ स्थानिक पातळीवर मोठ्या शहरामध्ये भाजपला मतदारांनी नाकारले आहे. मुंबई हे देखील मोठे शहर आहे. त्यामुळे शहरी मतदार भाजपला नाकारणार का? याबाबत उत्सुकता आहे. असे असले तरी इतक्यात अशा दृष्टीने पाहणे घाईचे ठरेल. उद्याच (8 डिसेंबर) गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल आहे. त्यात काय निकाल लागतो याबाबत ही मोठी उत्सुकता आहे.
महापुरुषांची बदनामी आणि भाजप
महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा तर अस्मितेचे राजकारण मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर केले जाणर हे निश्चित आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप प्रयत्न करत आहे का? असा सवाल मराठी मनामध्ये पाठीमागील प्रदीर्घ काळापासून आहे. अशात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून राज्यातील महापुरुषांबद्दल अनुचित उद्गार अनेकदा काढले गेले आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद असले तरी त्यांची नेमणूक केंद्र सरकार करते. केंद्रात भाजप आहे. दुसरे म्हणजे भाजपेच राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड आदी मंडळींनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भलतेच उद्गार काढले आहेत. त्यामुळे भाजप महाराष्ट्रविरोधी पक्ष आहे का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अनेकदा टीका केली आहे.
सहानुभूतिची लाट
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिवसेनेतील 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. त्यामुळे मुंबईतील आणि राज्यातील जनतेमध्ये सहानुभूतीची मोठी लाठ उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटतील अशीही शक्यता आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षही मुंबईवर डोळा ठेऊन आहे. दिल्लीतील निवडणुकीत यश मिळाल्यामुळे आपच्या आशा पल्लवीत झाल्या तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत आम आदमी पक्षही उतरण्याची शक्यता आहे. असे घडले तरी आम आदमी पक्षाची ताकद मुंबईत अगदीच नगण्य आहे. त्यामुळे खरी लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातह होईल हे नक्की.