BMC Election 2023: गुजरातच्या यशामुळे मुंबई भाजपच्या आशा पल्लवीत! पण, उद्धव ठाकरे यांचे आव्हान पेलणार का?
शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते.
मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election 2023) नव्या वर्षात तरी पार पडणार का? याबाबत उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम असतानाच राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर सुरु आहे. बोलले जात आहे की गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्याचा परिणाम मुंबईतील गुजराती मतदार भाजपकडे वळविण्यास भाजप यशस्वी होऊ शकतो. भाजपने गुजराती मतदार आणि उत्तर भारतीय मतदार यांची सांगड घालून मुंबई महापालिका निवडणूक लढली तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षासमोरील आव्हान वाढू शकते. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते.
शिवसेनेतील फूट भाजपच्या पथ्यावर?
मुंबईत शिवसेनेची मोठी ताकत आहे. त्या ताकतीच्या जोरावर पाठिमागील अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. असे असले तरी ही ताकत भंगली आहे. 'शिवसेना' पक्षात अभूतपूर्व फूट पडली आहे. एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालून बाजूला झाला आहे. सध्या हा गट आपण स्वतंत्र असून आपला पक्ष 'बाळासाहेबांची शिवसेना' असा सांगत असला तरी त्यावर असलेले भाजपचे नियंत्रण सर्वश्रुत आहे. दुसऱ्या बाजूला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट' आणि भाजप असा सामना झाला तर शिंदे गट भाजपसोबत जाणार यात काहीच आश्चर्य नाही. सहाजिकच गुजराती आणि उत्तर भारतीय मते सोबतच शिंदे गट असे समिकरण जुळले तर मुंबई महापालिका निवडणुकीत ते भाजपच्या पथ्यावर पडेल असे दिसते. (हेही वाचा, BMC Elections 2023: दिल्लीत भाजप पराभूत, मुंबईत काय होणार? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा लागणार कस)
मुंबई,ठाकरे आणि शिवसेना
मुंबई, ठाकरे आणि शिवसेना हे पाठिमागील अनेक वर्षांचे समिकरण. जण मुंबईच्या राजकीय संस्कृतीचाच भाग. त्यामुळे मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार फुटले तरीही मुंबईत उद्धव ठाकेर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फार मोठा फरक पडल नाही. दसरा मेळाव्यात झालेल्या गर्दीतून हे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा असला आणि संघटनात्मक बांधणी जरी भक्कम असली तरीसुद्धा पक्षाची पुनर्बांधनी नक्कीच करावी लागणार आहे. ती झाली तर गुजराती, उत्तर भारतीय मते आणि शिंदे गटाचे सहकार्य मिळूनही भाजपसाठी सामना मोठा आव्हानात्मक असणार आहे.
मविआचा प्रयोग
मुंबई महाालिकेत सध्या कोणाचीच सत्ता नाही. पालिकेवर सध्या प्रशासक काम करतो आहे. असे असले तरी आकडेवारीसाठी मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल (एकूण जागा - 222) विचारात घेता, शिवसेना - 94, भाजप - 83,काँग्रेस - 28,राष्ट्रवा दी - 8, सपा - 6, मनसे - 1,एमआय एम - 2 अशी आकडेवारी मिळते. यात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असला तरी, शिवसेनेतील फुटीमुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे किती नगरसेवक गेलेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे किती आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेनेत फूट पडली असली तरी राज्यात महाविकासआघाडी अधिक भक्कमपणे एकत्र आल्यास त्याचे पडसाद मुंबई महापालिकेत पाहायला मिळू शकते. पण या सगळ्या जर तरच्याच गोष्टी आहेत. अद्याप बीएमसी निवडणुकीची घोषणा व्हायची आहे. इतक्यात ती दृष्टीक्षेपातही नाही. त्यामुळे आगामी काळात काय घडते याबाबत उत्सुकता आहे.
सहानुभूतिची लाट
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिवसेनेतील 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. त्यामुळे मुंबईतील आणि राज्यातील जनतेमध्ये सहानुभूतीची मोठी लाठ उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटतील अशीही शक्यता आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षही मुंबईवर डोळा ठेऊन आहे. दिल्लीतील निवडणुकीत यश मिळाल्यामुळे आपच्या आशा पल्लवीत झाल्या तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत आम आदमी पक्षही उतरण्याची शक्यता आहे. असे घडले तरी आम आदमी पक्षाची ताकद मुंबईत अगदीच नगण्य आहे. त्यामुळे खरी लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातह होईल हे नक्की.