BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज; Iqbal Singh Chahal मांडणार बजेट
आता यंदा कितीची तरतूद होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणार्या मुंबई महानगर पालिकेचा (Brihanmumbai Municipal Corporation) आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यंदा सलग दुसर्या वर्षी बीएमसीचा अर्थसंकल्प प्रशासक आणि मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल ( Iqbal Singh Chahal) मांडणार आहे. बीएमसी मध्ये सध्या नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने कारभार प्रशासक म्हणून पालिका आयुक्त सांभाळत आहे. परिणामी यंदाही स्थायी समिती अध्यक्षांविनाच हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आज मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह सकाळी 10.30 वाजता बजेट सादर करतील. BMC Budget 2023 Live Streaming: मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प इथे पहा लाईव्ह! (Watch Video).
येत्या काही काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका लागण्याची शक्यता आहे. तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे पहिलं बजेट असल्याने या बजेट मध्ये शिंदे फडणवीस सरकारची छाप असण्याची शक्यता आहे. मागील 25 वर्ष शिवसेना बीएमसी वर राज्य करत होती. त्यावरून शिवसेनेला भाजपा, कॉंग्रेस आणि मनसे कडून अनेकदा घेरण्यात आले आहे. सत्तांतरानंतर बीएमसीच्या अनेक कामकाजावर शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र डागलं आहे. मुंबईतील रस्त्यांचं कॉंक्रेटीकरणाच्या मुद्द्यावरून, पालिकेच्या एफडीजवरून मागील काही दिवसांत बीएमसीला आणि सरकारला अनेक मुद्द्यांवरून त्यांनी घेरलं आहे. त्यामुळे आजच्या बजेट मध्ये कोणत्या घोषणा होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान कोस्टल रोड हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्याच्या दृष्टीने बजेट मध्ये काय घोषणा होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. बीएमसीने केलेल्या एफडींचा विषय देखील मागील काही दिवस गाजत आहे. त्यामुळे पुढील वर्षभराच्या पालिकेच्या कारभाराच्या दृष्टीने त्यामध्ये कोणत्या योजना आणि त्यांचे अर्थनियोजन पालिका कसं करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी 45,949 कोटींचं बजेट सादर करण्यात आलं होतं. मुंबईकरांच्या दृष्टीने पाणी, रस्ते, वाहतूकीच्या सोयीसुविधा, शहरातील प्रदुषण, कचरा व्यवस्थापन आणि पालिकेच्या शाळांमधील शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काही महत्त्वाच्या सोयी सुविधा पालिका उपलब्ध करून देणार का? हे देखील या बजेट मध्ये पाहणं गरजेचं आहे.