BMC On Flood: यंदा मुंबई तुंबणार नाही! बीएमसी म्हणते 'शहरात 60-70मिमी पाऊस पडला तरी साचणार नाही पाणी'

हे आम्ही नव्हे मुंबई महापालिकाच म्हणते आहे. मुंबई महापालिकेने तसा दावा (BMC Claims) केला आहे.

BMC | (File Photo)

मुंबई (Mumbai) शहराची पावसाळ्यात तुंबई (Waterlogging in Mumbai) होणे हे काही नवीन नाही. नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे मुंबईत नेहमीच साचते पाणी, असे आता गृहीतच धरले जाते. मुंबईचे नागरिकरण, वाढता ताण आणि भौगोलिक स्थितीचा विचार न करता प्रत्येक पावसाळ्यात मुंबई महापालिकेवर खापर फोडायचे आणि पावसाळा संपला की सगळे विसरुन जायचे. आजवरचा हा समज यंदा मुंबई महापालिकेनेच खोडून काढाचे ठरवले आहे. मुंबई महापालिकेने (BMC) दावा केला आहे की, यंदा 60 ते 70 मिलीमीटर इतका जरी पाऊस पडला तरीही मुंबईत पूर येणार नाही की पाणीही साचणार नाही. हे आम्ही नव्हे मुंबई महापालिकाच म्हणते आहे. मुंबई महापालिकेने तसा दावा (BMC Claims) केला आहे.

मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात फारसा पूर येणार नाही असा दावा विस्ताराने करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'मुंबईत मान्सूनचे 10 ते 12 दिवस असे असतात ज्या काळात शहरात 120 ते 150 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडतो. हे प्रत्येक पावसाळ्यात घडते. हा पाऊस प्रति तास 60 मिमी संततधार पडतो. काधी कधी तो 120 ते 150 मिमीची पातळी ओलांडतो.' (हेही वाचा, Pre-monsoon Showers in Mumbai: मुंबईत 12 मेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज)

मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी म्हटले की, आम्ही पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची 73% समस्या सोडवली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात साधारण ताशी 60 ते 70 मिमी वेगाने पाऊस जरी बसरसा तरी शहरात पारसे पाणी साचणार नाही. मात्र, याही पेक्षा अधिक पाऊस संततधार कोसळत राहिला तर सहाजिकच मुंबईत पाणी साचू शकते. परंतू, ते फार काळ असणार नाही. अल्पावधीतच हे पाणी ओसरेल.

मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आणि प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय अपत्ती निवारण दलाच्या म्हणजेच एनडीआरएफच्या 5 तुकड्या तैनात असतील शिवाय नौदलाच्या तुकड्याही काही ठिकाणी तैनात ठेवल्या जातील. प्रामुख्याने अंधेरी परिसरात एनडीआरएफच्या तीन तुकड्या तैनात असतील. तर इतर भागांमध्ये दोन पथके तैनात असतील. नैदलाच्या 15 पानबुड्या आणि 500 जवानसुद्धा पुरस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या मदतीला असणार आहेत.

संभाव्य पूरस्थितीचा विचार करता मुंबईतील मान्सूनपूर्व कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. वेलसारु यांनी म्हटले की, जवळपास एकूण मान्सूनपूर्व कामांपैकी 105% काम पूर्ण झाले आहे. तर मिठी नदी सफाईचे काम 98% पूर्ण झाले आहे. मुंबई महापालिका दरवर्षी एक लक्ष्य निश्चित करते आणि त्यानुसार कामे पूर्ण करते सोबत आकडेवारीही तपासते असे वेलसारु म्हणाले.

पावसाळ्यांमध्ये रस्त्यांवरील खड्डे आणि गटारांची उगडी झाकणे अनेकदा महत्त्वाचे विषय ठरतात. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने mypotholetracking हे मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. शिवाय याबाबत वेबसाईटवरही माहिती दिली जाईल. त्यामुळे नागरिकांना भरती-ओहोटी आणि इतर बाबींची 48 तासांपूर्वीच माहिती मिळेल.