BMC Property Tax: मुंबई महापालिकेकडून 4,856 कोटींचा मालमत्ता कर जमा
सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या 4,500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक (107.95 टक्के) कर संकलित करण्यात आला आहे
यंदा मुंबई महानगर पालिकेने मालमत्ता करातून चांगले पैसे जमा केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा 4,856.38 कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ४,५०० कोटी रुपये कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्याहून सुमारे 356.38 कोटी रुपये अधिक म्हणजे 108 टक्के कर संकलन करून कर निर्धारण आणि संकलन विभागाने उत्तम कामगिरी नोंदवली आहे. तसेच, या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी दिनांक 25 मे 2024 हा अंतिम दिवस होता. या अंतिम दिनांकापर्यंत करभरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकाना आता दरमहा 2 टक्के दंड आकारण्यात येणार आहे. (हेही वाचा - BMC Property Tax Hike: नववर्षात मुंबईकरांचा मालमत्ता कर वाढणार, दोन वर्षांसाठी वाढीव आकारणी)
मालमत्ता करभरण्यासाठी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आदीद्वारे सातत्याने आवाहन करण्यात आले. करभरणा करण्यासाठी मालमत्ता धारकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व विभागातील नागरी सुविधा केंद्रे रविवारी, शनिवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. तसेच या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या 4,500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक (107.95 टक्के) कर संकलित करण्यात आला आहे. दिनांक 25 मे 2024 रोजी 170.59 कोटी तर, दिनांक 26 मे 2024 रोजी 1.52 कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला.