I.N.D.I.A Alliance Meet Today: 'इंडिया आघाडी' बैठकीची भाजपकडून 'Ghamandia Meeting' म्हणत खिल्ली; 'मविआ' नेत्यांकडून प्रत्युत्तर
पाटना, बंगरुळू नंतर पार पडत असलेली ही तिसरी बैठक आहे. या बैठकीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली असून, 'घमंडी अलायन्स' अशी खिल्ली उडवली आहे
BJP Mocked INDIA Alliance: विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवरील 'इंडिया आघाडी'ची बैठक मुंबई ( I.N.D.I.A Alliance Meet Mumbai ) येथे पार पडत आहे. पाटना, बंगरुळू नंतर पार पडत असलेली ही तिसरी बैठक आहे. या बैठकीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली असून, 'घमंडी अलायन्स' अशी खिल्ली उडवली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी विरोधकांच्या आघाडीवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप करत हल्ला चढवला. त्यांनी मुंबईत जमलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीला 'म्युझिकल चेअर' असेही संबोधले. दिल्ली येथील भाजप मुख्यालयाती पत्रकार परिषदेला संबोधित करताना संबित पात्रा म्हणाले, सर्वांना माहित आहे की GM (घामिंडिया बैठक) मुंबईत होत आहे. या पक्षांनी 20 लाख कोटी रुपयांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार केला आहे
संबित पात्रा यांनी भाजपच्या वतीने पुढे म्हटले आहे की, मुंबईत पार पडत असलेल्या 'संगित खुर्ची' ( I.N.D.I.A Alliance) बैठकीबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आशा प्रकारच्या विरोधकांच्या बैठका आमच्यासाठी नव्या नाहीत. मग ते सन 2014 असो की 2019. विरोधकांची युती एक स्वार्थी लोकांची युती आहे. ज्यात कोणतीही शक्ती नाही. केवळ जबरदस्तीने एकत्री येणे आहे असेही ते म्हणाले. भ्रष्टाचार करणे. त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे एवढाच त्यांचा एकमेव अजेंडा असल्याची टीकाही पात्रा यांनी केली.
भाजप प्रवक्त्यांची री महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ओढली. त्यांनी म्हटले की, 'घमंडी' मंडळीं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देण्याचे काम करते आहे. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. दरम्यान, मुंबईतील भाजप नेते आशीष शेलार यांनीही ट्विटरच्या माध्यातून 'इंडिया आघाडी' बैठकीवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला. ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या. अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे... फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना... महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!, असे शेलार यांनी म्हटले आहे.