Ganesh Naik DNA Test: डीएनए चाचणीसाठी तयार असलेल्या गणेश नाईक यांना जामीन मिळणार का? अटकेची टांगती तलवार कायम
नवी मुंबईतील भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या जामीन अर्जावर आज (28 एप्रिल) रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी (Anticipatory Bail) न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर 27 एप्रिल रोजीच सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने या अर्जासाठी आजची तारीख दिली. त्यामुळे नाईक यांना दिलासा मिळतो किंवा नाही याबाबत उत्सुकताआहे. दरम्यान, जे घडले ते परस्पर संमतीनेच घडले. त्यामुळे त्याला बलात्कार मानू नये, असे गणेश नाईक यांनी वकीलाकरवी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला गणेश नाईक हे डीएनए चाचणी करण्यासही तयार असल्याचे त्यांच्या वकीलाने म्हटले आहे.
गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वीच बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होताच गणेश नाईक बेपत्ता झाले आहेत. ते जाहीरपणे कुठे दिसले नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला गणेश नाईक यांनी आपल्या वकीलाकरवी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने काल म्हणजेच 27 फेब्रुवारीला दोन्ही पक्षकारांचे म्हणने ऐकून घेतले आहे. त्यानंतर या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालया काय निर्णय देते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला)
नेरुळ पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई आणि नेरुळ या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी नाईक यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. बेलापूर पोलीसांनी न्यायालयात सांगितले की, तक्रारदाराला धमकाविण्यासाठी गणेश नाईक यांनी वापरलेले गुन्ह्यातील हत्यार जप्त करायचे आहे. त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी मिळावी. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गणेश नाईक यांच्यावरील आरोपांचा प्रतिवाद करताना त्यांच्या वकिलाने न्यायालयात म्हटले की, जो प्रकार झाला तो परस्परसंमतीनेच झाला आहे. त्यामुळे या प्रकाराला बलात्कार मानू नये. नाईक यांच्या वकिलाच्या युक्तीवादावर आक्षेप घेत फिर्यादीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, 2010 ते 2017 या काळात आरोपीने फिर्यादीच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्तापीत केल्याचे म्हटले. दरम्यान, पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी गणेश नाईक यांची पोलीस कोठडी हवी अशी मागणी पोलिसांनी करताच नाईक यांच्या वकिलांनी ते डीएनए चाचणी करण्यास तयार असल्याचे म्हटले.