IPL Auction 2025 Live

महाविकास आघाडीने स्वतःमधील सुसंवाद वाढवावा,तोपर्यंत चहापानाला भाजप जाणार नाही: देवेंद्र फडणवीस

या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने (BJP) बहिष्कार टाकला आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र विधिमंडळाच्या 24 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget)  पूर्वसंध्येला आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने सर्वपक्षीय चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या प्रमाणेच आजच्या या चहापानाच्या कार्यक्रमावर सुद्धा विरोधी पक्ष भाजपने (BJP) बहिष्कार टाकला आहे. 'सध्याच्या महाविकासाआघाडी सरकारमधील पक्षांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळं त्यांनी आधी आपसांत संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावं,' असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विरोधी पक्ष पत्रकार परिषदेत लावत आपण चहापानाला जाणार नाही असे सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष पत्रकार परिषद पार पडली ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासहित अनेक मुद्द्यांवर भाजपकडून सरकारला सवाल करण्यात आले. यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार ही मंडळी उपस्थित होती.

यावेळी बोलताना सरकारनं शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत त्यांनी अंमलात आणली. कर्जमाफीमध्ये केवळ पीककर्जाचा समावेश आहे. शेडनेट, पशुपालन अशा कर्जाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ही फसवणूक आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारच्या चहापानाला जाऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.तसेच राज्यात महिलांवरील अत्याचार पराकोटीला गेला आहे. पोलीस दलाचं खच्चीकरण केलं जात असल्यानं त्यांचं मनोबल घटलं आहे. त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू,' असाही इशारा फडणवीस यांनी दिला.

मागील काही काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अनेक प्रकल्पांना ब्रेक लावला आहे यावर बोलताना सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार सुरु आहे, मात्र जलयुक्त शिवार सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही असे फडणवीस यांनी ठाम मत व्यक्त केले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.त्यामुळे काँग्रेसच्या 'शिदोरी' मासिकावर कारवाई करावीच लागेल असा थेट इशारा फडणवीस यांनी देताना, इंदिराजींबाबत 10 मिनिटात माफी मागणारे सावरकरांबाबत मौन का? असा सवालही केला आहे.

दरम्यान या वेळी शरद पवार यांच्या भूमिकांवर भाष्य करत, फडणवीस यांनी अयोध्येत मशिदीसाठी ट्रस्ट का नाही या प्रश्नावर उत्तर दिले. राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मुस्लिम समाजाची सर्व स्थळे ही वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, तेथे ट्रस्ट नसतो. असे म्हणताना सध्या मुस्लिम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे अशा शब्दात फडणवीस यांनी पवारांना उत्तर दिले आहे.