Maharashtra Legislative Assembly Speaker: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी दाखल केला अर्ज
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 जुलै रोजी होणार आहे.
Maharashtra Legislative Assembly Speaker: महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवे ट्विस्ट येत आहेत. विधानसभेचे अध्यक्षपद बरेच दिवस रिक्त होते, मात्र लवकरच या पदावर भाजप नेते राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) दिसणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Maharashtra Legislative Assembly) अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 जुलै रोजी होणार आहे.
गेल्या वर्षी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद रिक्त होते. एएनआयच्या वृत्तानुसार, भाजप आमदारांच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडीवर चर्चा झाली. बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी बोलावण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जुलैला सभापतींची निवडणूक होणार आहे, तर 4 जुलैला नवीन सरकारला विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागणार आहे. (हेही वाचा - Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' होऊ शकत नाही; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा)
शिवसेनेविरोधात बंडाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासह 31 महिन्यांचे महाविकास आघाडी (MVA) सरकार संपुष्टात आले. मात्र, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातचं आता राज्यात सुरू असलेली राजकीय चढाओढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षणही समोर आले आहे. महाराष्ट्रात काय चालले आहे यावर लक्ष ठेवून आहे, असे शिवसेनेचे मुख्य सचिव सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले. या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 15 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असल्याने या नेत्यांना विधानसभेतून निलंबित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.